राज्यातील सामान्य लोकांना दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करा - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची मागणी

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
*_शासनाने सर्व समाज घटकांना न्याय द्यावा - माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांचे निवेदन_*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्यातील सामान्य लोकांना दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी केली आहे. शासनाने राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय द्यावा याबाबत माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी तहसीलदार यांना गुरूवार, दिनांक १ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात एकूण २२ मागण्यांचा समावेश आहे. त्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. १) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी. दुष्काळ संबंधित दोन्ही शासन निर्णयातील तफावत दूर करून सर्वच महसूल मंडळांना एनडीआरएफ निकषांच्या चारपट मदत देण्यात यावी., २) राज्यात रिक्त असलेली सर्व विभागांच्या सर्व संवर्गाची अडीच लाख रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत., ३) छुप्या पद्धतीने सुरू असलेली कंत्राटी भरती तत्काळ बंद करावी., ४) अवाजवी परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे व याआधी घेण्यात आलेले अवाजवी शुल्क परत करावे., ५) ६० हजार रिक्त पदांची शिक्षक भरती, रखडलेल्या सर्व प्राध्यापक पदांची भरती यांसारख्या रखडलेल्या भरती प्रक्रिया तत्काळ सुरू कराव्यात. तसेच प्रलंबित असलेल्या सर्व नियुक्त्या तात्काळ देण्यात याव्यात., ६) राज्यात पेपरफुटी संदर्भात राजस्थान, उत्तराखंडच्या धर्तीवर कडक कायदा करावा., ७) दत्तक शाळा योजना रद्द करावी., ८) महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात शक्ती कायद्याची अंबलबजावणी करण्यात यावी., ९) नौकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी सक्षम धोरण आणावे., १०) विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठीची आणि महिलांसाठीची रखडलेली सर्व शासकीय वसतिगृहे तत्काळ सुरू करण्यात यावीत., ११) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजमाफी करण्यात यावी., १२) खेळाडूंची रखडलेली थेट नियुक्ती देण्यात यावी., १३) मराठा समाजाच्या आरक्षणातील संभ्रम दूर करून धनगर, मुस्लिम व लिंगायत या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ही सोडविण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे वाढविण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा आणि जातनिहाय जनगणना करण्यात यावी., १४) अंगणवाडी सेविका, आशा सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, संगणक परिचालक, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड अशा सर्व संघटनांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत., १५) सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थाना प्रत्येकी एक हजार कोटी देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यात यावे., १६) विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्या त्वरित वितरीत करण्यात याव्यात., १७) कापूस, कांदा, तूर, सोयाबीन यासह अनेक पिकांना चांगला दर मिळत नसल्याने उत्पादन खर्च लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत अनुदान देण्यात यावे., १८) खतांच्या लिंकिंगमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी योग्य धोरण आणावे., १९) प्रयोगशील शेतकरी प्रोत्साहन योजना राबविण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना नियमित व दिवसा वीज पुरवठा देण्यात यावा., २०) युवा पिढीचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यातील ड्रग्सचे रॅकेट पूर्णपणे नष्ट करण्यात यावे., २१) दुधाचे भाव पडले असून यातून दूध उत्पादकांचा खर्च ही भरून येत नाही. त्यामुळे दुधाला भाव देण्यात यावा / अनुदान देण्यात यावे., आणि २२) आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व अडीच लाख पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करावी. या मागण्या करण्यात आल्या आहेत. सदरील निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) या पक्षाचे अंबाजोगाई व केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर दगडूसाहेब देशमुख यांच्यासह तारेख अली उस्मानी, हमीद चौधरी, माजी नगरसेवक शेख मुनवर, संजिवनी देशमुख, तानबा लांडगे, प्रशांत पवार, अंकुश ढोबळे, बालाजी शेरेकर, यशोधन लोमटे, इम्रान पठाण, फैजान मिर्झा, शेख अकबर, गणेश शेप, व्यंकट मुंडे, ऍड.एस.के.पठाण, ऍड.एस.एम.कांबळे, ऍड.नरेश साबणे, सादेक शेख, नामदेव गडदे, अमन परदेशी, रविंद्र मोरे, धनराज सोनवणे, रामराव आडे, सुभाष वडमारे, वैभव पाटील, सुरेश काळे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
*महाराष्ट्रात सर्वच समाज घटक त्रस्त आहेत :*
आज राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, तूर या शेतमालाला भाव नाही, अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकाचं नुकसान होऊन ही पिक विम्याची नुकसान भरपाई मिळत नाही. नोकरभरतीसाठी हजार रूपये शुल्क आकारून ही होत असलेली पेपरफुटी ही तर नेहमीचीच बाब झाली आहे. यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर आणि बेरोजगारांवर अन्याय होत आहे. राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून युवांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाहीच पण, महाराष्ट्राच्या वाट्याचे हक्काचे प्रकल्प इतर राज्यांत आणि त्यातही प्रामुख्याने गुजरातमध्ये नेले जात आहेत. कामानिमित घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ही दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. या सर्व प्रश्नांची सोडवणूक महायुती सरकारने तातडीने करावी.
*- पृथ्विराज साठे*
(माजी आमदार, केज विधानसभा मतदारसंघ.)
=========
*नौकरी मिळत नसल्याने युवा वर्ग अस्वस्थ आहे :*
अनेक दिवस आंदोलन करून ही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या आंदोलनाकडं सरकार ढुंकून ही बघत नाही. दरवर्षी उच्च शिक्षण घेऊन ही नौकरी मिळत नसल्याने राज्यातील युवा वर्ग अस्वस्थ आहे. राज्यात ३२ लाख युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून परीक्षा फी, पेपरफुटी, रखडलेली अडीच लाख रिक्त पदांची भरती हे प्रश्नही सुटलेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च सरकारकडून दरवर्षीच कमी - कमी केला जातोय. देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या प्रश्नांकडे ही हे सरकार लक्ष देत नाही. आमदार रोहितदादा पवार यांनी पुणे ते नागपूर अशी ८०० कि.मी. हून अधिक लांबची युवा संघर्ष यात्रा काढून राज्यातील या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि समूह शाळा योजनेची अंमलबजावणी करण्यापासून सरकारला माघार घ्यावी लागली. परंतु, अद्याप ही अनेक प्रश्नं शिल्लक आहेत. पण, सरकार हे प्रश्न सोडविण्यासाठी काहीही हालचाल करीत नाही. असे अनेक प्रश्नं आणि अडचणी लोकांना भेडसावत असून ही त्या सोडविण्याऐवजी केंद्र व राज्य सरकार हे जातीयवाद, धार्मिक संघर्ष आणि असेच इतर अनावश्यक मुद्दे पुढं आणून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळविण्याचं काम करीत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला तडा जातोच पण, राज्याच्या प्रगतीला ही खीळ बसत आहे आणि त्यात नुकसान मात्र सामान्य माणसाचेच होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही सदरील प्रश्नांकडे सरकार व जनतेचं लक्ष वेधत आहोत. हे प्रश्न सर्वसामान्यांशी निगडीत आहेत. म्हणून ते तातडीने सोडवा. सामान्य लोकांना दिलासा द्या, या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
*- अमर देशमुख*
(तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट.)

