दुःखाचा हुंदका गिळत वैभवीने गाठलं यशाचं शिखर - राजेसाहेब देशमुख

Zilla Vishesh

वैभवी देशमुख हिच्या १२ वी परीक्षेतील यशाबद्दल राजेसाहेब देशमुख यांच्याकडून अभिनंदन

=======================

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने अत्यंत कठीण व आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून ८५.३३ टक्के गुण मिळविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी तिचे मस्साजोग येथे जाऊन वैभवीचे अभिनंदन व कौतुक करून तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी मस्साजोग येथे जाऊन बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिचे शाल व पुष्पहार देवून अभिनंदन व कौतुक केले. यावेळी राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत शिवसेना (उबाठा) चे मदनलाल परदेशी, अमर शिंदे, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, ईश्वर शिंदे, बाळासाहेब देशमुख, किरण देशमुख, बप्पासाहेब देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. वैभवी देशमुख हिने मिळविलेल्या सुयशाबद्दल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की, वैभवीनं मिळविलेल्या यशानं तिच्यातील हुशारीचं आणि जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन झाल्याचं सांगून तिच्या यशानं संपूर्ण बीड जिल्हा, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे, वैभवी ही लढवय्या बापाची लढवय्यी लेक आहे..! अशा गौरवपर शब्दांत देशमुख यांनी तिचं कौतुक केलं आहे. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, इयत्ता १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत विज्ञान शाखेत ८५.३३ टक्के गुण मिळवून वैभवी उत्तीर्ण झाली आहे. वडील दिवंगत संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर वैभवी ही अत्यंत दु:खद, प्रतिकुल परिस्थितीला सामोरं गेली. न्यायाचा लढा देत तिने मिळवलेलं यश हे समाजातील इतर विद्यार्थ्यांना जिद्दीच्या बळावर लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा देते. आज संतोष आण्णा हयात असते तर यांना ही खुप आनंद झाला असता, जरी ते आज आपल्यासोबत नसले तरी त्यांचे आशिर्वाद आणि प्रेरणा आपल्या सोबत आहे. दुःखाचा हुंदका गिळत वैभवीने घवघवीत यश मिळवलं, यशाचं शिखर गाठलं आहे. पाठीवर कौतुकाची थाप द्यायला जरी वडील नसले तरी आज संपूर्ण महाराष्ट्रच वैभवीच्या पाठीवर कौतुकाची थाप देतोय. वैभवीला डॉक्टर व्हायचे आहे. तिच्या दुरदृष्टी, संयम, कष्ट, अभ्यासू वृत्ती व जिद्दीला सलाम. यापुढेही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिला हे यश असंच मिळत राहो, देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. असा विश्वास देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी वैभवीला तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.