एल्गार मेळाव्यातून राज्यव्यापी कर्जमुक्ती आंदोलनाची मशाल पेटली

Maharashtra

कर्जमुक्ती द्या, अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही - रविकांत तुपकर

 

देवळा येथील कर्जमुक्ती एल्गार मेळाव्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सरकार विरोधात रणशिंग फुंकले..!

=======================

अंबाजोगाई (प्रतिनिधी) 

विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे खोटे आश्वासन देणाऱ्या राज्यातील महायुती सरकार विरोधात क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. याच अनुषंगाने राज्यात विविध जिल्ह्यात कर्जमुक्ती एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवार, दि.१७ मे रोजी अंबाजोगाई तालुक्यातील मांजरा बेल्ट पट्ट्यातील देवळा येथे आयोजित कर्जमुक्ती एल्गार मेळाव्यात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकार विरोधात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळविण्यासाठी मशाल पेटवून राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात दुर्लक्ष केले तर जून महिन्यामध्ये राज्यभरात आक्रमक आंदोलन छेडले जाईल, राज्यातील कुठल्याही मंत्र्याला रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारने याची वेळीच दखल घ्यावी अन्यथा मुंबई येथे मंत्र्यांना मंत्रालयातील त्यांच्या दालनाताच घेराव घालू, कुठल्याही परिस्थितीत राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याच्या निर्धार रविकांत तुपकर यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

कर्जमुक्ती एल्गार मेळाव्याच्या विचारमंचावर संयुक्त अध्यक्षस्थानी ह.भ.प.लालासाहेब (नाना) पवार आणि देवळा गावचे सरपंच रावसाहेब (नाना) यादव हे होते. कर्जमुक्ती एल्गार मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदासराव आपेट, बीड जि.प.चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, शेतकरी नेते अच्युतराव गंगणे, राज्य कोअर कमिटीचे सदस्य सत्तार पटेल, लातूर जिल्हाध्यक्ष अरूण कुलकर्णी, मराठा सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष नागनाथ जाधव, संभाजी ब्रिगेडचे (बीड पूर्व) जिल्हाध्यक्ष प्रवीण उत्तमराव ठोंबरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुरथ काशीद, नवनाथ शिंदे, रामराव बाबा लोमटे, विष्णु काका शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याचे प्रास्ताविक मेळाव्याचे निमंत्रक तथा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांचे मरण दारात आहे अशा परिस्थिती मध्ये कुठलाही पक्षीय अभिनिवेश न बाळगता आम्ही सर्वजण शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहू व शेतकरी चळवळीची वज्रमूठ आवळू असे आश्वासन देशमुख यांनी दिले. तर यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी न्याय मिळवण्यासाठी शेतकरी संघटनेने दिलेल्या एक कलमी कार्यक्रमाची कृती करण्याची गरज असून देवळा परिसरात यापूर्वी झालेल्या ऐतिहासिक ऊसाच्या झोनबंदी आंदोलनाच्या आठवणी जाग्या करून आगामी कर्जमुक्ती आंदोलनात मांजरा बेल्ट मधील शेतकरी मागे राहणार नाहीत. याची दक्षता घेण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदासराव आपेट यांनी उपस्थितांना केले. तसेच याप्रसंगी गावगाड्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या तरूण मुलांनी आगामी कर्जमुक्तीच्या आंदोलनात उतरून आपल्या मायबाप शेतकऱ्यांचा परत आत्मसन्मान मिळविण्यासाठी हीच एकत्र येण्याची योग्य वेळ आहे. आपण सर्वच युवा शेतकऱ्यांनी हे आंदोलन ताकदीने पुढे नेण्याचे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. कर्जमुक्ती एल्गार मेळाव्याच्या यशस्वितेसाठी अरूण आबा पवार, भास्करराव आगळे, नारायणराव मुळे, ऍड.राजेश शिंदे यांनी पुढाकार घेतला. कर्जमुक्ती एल्गार मेळाव्याला मांजरा ग्रीनबेल्ट मधील विविध गावांतील शेतकरी, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.