भाशिप्र संस्थेने मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकता जपली

Maharashtra

नविन शैक्षणिक धोरण हे राष्ट्र हिताचे, अंत:करणात ज्ञानाची आवड महत्वाची - ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर

=======================

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने ७५ वर्षांपासून काम करताना मुळ उद्दिष्टांपासून दूर न जाता प्रामाणिकता जपत समाज मनाचा विश्वास संपादन केला. संस्थेकडे व्यापक दृष्टी असून राष्ट्रहित तथा उत्तम भारतीय नागरिक घडविणारे संस्कार दिले जात असल्याने नांवलौकिक उच्च स्तरांवर जावून पोहोचला. ज्ञान हे माणसाच्या अंत:करणात असेल तर सर्वांगिण व्यक्तिमत्वाचा विकास झाल्याशिवाय रहात नाही. नविन शैक्षणिक धोरण हे जनकल्याणाचे असून जुनी कात टाकुन नविन बदल घडविण्याची क्षमता या धोरणात असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. 

 

 

येथील खोलेश्वर माध्यमिक शाळेच्या इमारत भुमीपुजन प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर संस्था अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, स्थानिक अध्यक्ष विजयराव वालवडकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना स्थानिक मंडळ कार्यवाह किरण कोदरकर यांनी संस्था ७५ वर्षांत जाताना भौतिक सुविधा ही काळाची गरज लक्षात घेत सुसज्ज शाळेची इमारत शहरात असावी. सर्वांच्या सहकार्याने आम्ही बांधकामाचा निर्णय पुर्णत्वाकडे घेवुन जावु हा विश्वास बोलून दाखविला. कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी बोलताना सांगितले की, शिक्षण संस्था चालवताना भौतिक सुविधा काळाची गरज असुन वर्तमानकाळात ठिकठिकाणी बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे सांगुन खोलेश्वर शाळेची भव्य इमारत पुर्ण करून दाखवू हा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षपदावरून बोलताना डॉ.आलूरकरांनी संस्था आता परिवर्तनाच्या दिशेने जात असुन गुणवत्तेत जशी आमची आघाडी, तशी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देखील संस्था कार्यकारी मंडळ संकल्पित विचाराने पुढे जात असल्याचे सांगितले. आपल्या भाषणात चैतन्य महाराजांनी सुरूवातीलाच सांगितले की, ज्ञान मंदिर बांधकामाचा शुभारंभ माझ्या हस्ते होणं हा पुण्यकर्माचा भाग म्हणावा. नव्हे तर माझे भाग्य देखील. ज्ञान संपादन करताना अंत:करणात आवड असणे महत्वाचे. नसेल तर ज्ञानाची अवस्था ही मृतप्राय होवून जाते. बलवान, ज्ञानमय कोष होण्यासाठी भाशिप्र सारख्या संस्था समाजात काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. परीक्षार्थी विद्यार्थी घडवणे त्यापेक्षा ज्ञान अंत:करणात गेले तर मुला - मुलींच्या व्यक्तिमत्वाचा विकास तर होतो. तत्वतः उद्याची पिढी सर्वांग सक्षम ज्यामुळे राष्ट्रहित देखील साध्य होते. सरकारने नविन शैक्षणिक धोरण हाती घेताना जीवनाला आवश्यक असणारे बदल या माध्यमातुन बीजाची पेरणी सुरू केली. ज्याचे परिणाम भविष्यात पहायला चांगले मिळतील. सनातन धर्माच्या संस्कृतीत बदल करताना काही गोष्टी जुन्या काढून नव्याने आणत परिवर्तन घडवण्याचा संकल्प आणि उद्देश अतिशय चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. माणसाचं जीवन वेगवेगळ्या ज्ञानाने समृद्ध असावं हाच हेतू नविन शैक्षणिक धोरणाचा असुन त्यानुसार ज्ञानाची प्राप्ती झाली. तर प्रत्येक माणुस स्वावलंबी बनल्याशिवाय रहाणार नाही. शाळेची इमारत भव्य दिव्यतेने निर्विघ्न पुर्णत्वाकडे जाईल आशिर्वाद ही त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दत्तप्रसाद गोस्वामी यांनी केले तर उपस्थितांचे आभार उन्मेष मातेकर यांनी मानले. वैयक्तिक पद्य प्रा.शैलेष पुराणिक यांनी सादर केले. तर श्रीकांत देशपांडे यांनी सादर केलेल्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमापूर्वी महाराजांच्यासह संस्था, पदाधिकारी, हितचिंतकांच्या उपस्थितीत प्रक्रिया पुर्ण झाली. यावेळी माजी प्राचार्य राजाभाऊ धाट, डॉ.शरदराव हेबाळकर, बिपीनदादा क्षीरसागर, चंद्रकांतराव मुळे, राम कुलकर्णी, उमेश जगताप, डॉ.अतुल देशपांडे, अविनाश तळणीकर, बाबुराव आडे, आप्पाराव यादव, सौ.वर्षाताई मुंडे, श्रीमती शरयुताई हेबाळकर, श्री.महामुनी सर, प्रा.पाठक, डॉ.प्रसाद कुलकर्णी, प्रा.अविनाश जोशी, प्रा.राहुल कुलकर्णी, प्रसिद्ध आर्किटेक्ट दिनेश पुरी, मुख्याध्यापक विवेक जोशी, शिवाजी हेंडगे आदींसह मान्यवर उपस्थित होते. संकुलातील सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होेते.