खा.सोनवणेंनी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याची बैठकीत मागणी

Rajkiya

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क 

 

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खा.सोनवणे बनले शेतकऱ्यांचा आवाज

 

बीड: जिल्ह्यातील बहूतेक भागात शेती खरडा-बर्डाची आहे. यात कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट शेतकऱ्यांच्या मागे उभाच असतात. अशावेळी शेतकऱ्यांना पीककर्ज आवश्यक असते. आतापर्यंत शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत पीककर्ज दिले जात असून त्याची मर्यादा वाढवून ता ५ लाखापर्यंत करावे, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.

 

जिल्हा नियोजन समितीची बैठक दि.१९ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री ना. अजित पवार, मंत्री ना.पंकजा मुंडे, आ.प्रकाश सोळंके, आ.सुरेश धस, आ.धनंजय मुंडे, आ.संदीप क्षीरसागर, आ.विजयसिंह पंडीत, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या विषयाला हात घालत बीडसाठी रेल्वे हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अहिल्यानगर ते परळी रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. परंतु मध्यल्या काळात रेल्वेचे रूळ अंथरण्याच्या कामासोबत विद्यूत जोडणीचे काम त्याच वेगाने होणे आवश्यक होते. विद्युत जोडणीस होत असलेल्या विलंबामुळे रेल्वेची हायस्पीड चाचणी होऊनही रेल्वे बीडपर्यंत येऊ शकलेली नाही. दरम्यान, रेल्वे विभागातील ओव्हर ब्रिज, अंडर ब्रिज तयार करीत असताना त्यात अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पालकमंत्री अजित पवार यांनीही यात लक्ष घातल्यास अनेक अडचणी सुटून रेल्वे कामाला हायस्पीड गती मिळेल, येणाऱ्या काळात बीडला रेल्वे येईल आणि जिल्हयाच्या विकासाला चालना मिळेल, असेही खा.सोनवणे म्हणाले.

 

००

खा.सोनवणेंनी शब्द टाकला अन् दादांकडून होकार

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे रात्रंदिवस काम सुरू आहे परंतु याचसोबत धाराशिव-बीड-संभाजीनगर रेल्वेची मागणी देखील पुढे आलेली आहे. आपण केंद्रात यासाठी आवश्यक पाठपुरावा करत आहोत, असे सांगत खा.सोनवणे यांनी धाराशिव-बीड-संभाजीनगर रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी राज्यशासनाने अर्धा हिस्सा देण्यात यावा, अशी महत्वपुर्ण मागणीही उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील ही मागणी मान्य केली.

 

००

 

झेडपीच्या अतिरिक्त कारभाराच्या विषयावर चर्चा

जिल्हा परिषद प्रशासनात काही कर्मचारी प्रशासकिय बदल्यानंतरही अतिरिक्त कामकाजाच्या नावाखाली पुन्हा त्याच ठिकाणी पदभार घेतात. मागील दहा वर्षांपासून जिल्हा परिषदेत जवळपास ७७ कर्मचारी असेच काम आहेत. यामुळे अशा कर्मचाऱ्यांकडे असलेला पदभार काढून त्यांना मुळे ठिकाणी पाठवावे, अशी भुमिकाही खा.बजरंग सोनवणे यांनी मांडली. यावेळी या विषयावर अधिकाऱ्यांनी चर्चा करून कार्यवाही करू, असे सांगितले.

००

बोगस पिकविम्यावरही उठवला आवाज 

 

बीड जिल्ह्यात मागील काळात बोगस पीक विमा भरून परळी भागातील लोकांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही खा.सोनवणे यांनी केली.