खा. बजरंग सोनवणेंची शिवराज दिवटे यांना रुग्णालयात भेट; परळीतील गुंडगिरीवर कठोर कारवाईची मागणी

Zilla Vishesh

 

 

बीड: परळी तालुक्यातील अमानुष मारहाणीच्या घटनेत जखमी झालेला लिंबोटा येथील तरूण शिवराज दिवटे हा अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकिय रूग्णालयात उपचार घेत आहे. दि.१८ रोजी खा.बजरंग सोनवणे यांनी त्याची रूग्णालयात जावून भेट घेत सर्व घटनाक्रम जाणून घेतला. शिवाय, घाबरू नको, मी सोबत आहे, असाही धीरही दिवटेला दिला. दरम्यान, गेल्या कांही वर्षात तयार झालेला परळी पॅटर्नचा बिमोड करण्यासाठी विशेष आयपीएस अधिकारी नेमून येथील गुंडगीरी मोडीत काढावी, अशी मागणीही खा.सोनवणे यांनी केली.

दोन दिवसांपुर्वी परळीतील अमानूष मारहाणीचा व्हिडीओ समोर आला होता. यात शिवराज टिवटे यास मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात शिवराज दिवटे या तरूणावर उपचार सुरू आहेत. त्याठिकाणी जावून त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्याला मिळत असलेल्या उपचाराबाबत संबंधित डॅाक्टर व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांचेकडुन माहिती घेतली. दिवटे कुटूंबियांना धीर दिला. त्यानंतर केज-अंबाजोगाई रोडवर झालेल्या कंटेनर अपघातात जखमी झालेल्या रुग्णांचीही भेट घेतली. डॉक्टरांशी चर्चा करून सगळ्यांना योग्य ती वैद्यकीय मदत मिळतेय ना, याची खातरजमा केली. यावेळी बोलताना खा.सोनवणे म्हणाले, परळी व परिसरात दहशतीचा धंदा निर्माण करण्याकडे नवतरुणांचा कल वाढत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. हे थांबवायचे असेल तर कायद्याचे राज्य स्थापण होणे गरजेचे आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एक स्वतंत्र आयपीएस अधिकारी नेमण्यात यावा, परळीतील सर्वच वादग्रस्त पोलिस अधिकारी यांच्या तातडीने बदल्या कराव्यात, ⁠शिवराज दिवटे प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोरात कठोर शासन करावे, अशा मागण्या राज्य सरकारकडे करत आहे. तर दिवटे परिवाराला पोलिस संरक्षण देण्यात यावे. त्यांना रूग्णालयातही धमकावण्याचे काम सुरू आहे. त्याकडे पोलीस प्रशासनाने गांभिर्याने पहावे अशी मागणी केली. राज्य सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्या आज संध्याकाळपर्यन्त मान्य कराव्यात, अन्यथा बीड जिल्हा उद्या बंद करण्यासाठी जिल्हा बंदची हाक देण्यात येईल, असा इशाराही यावेळी खा.सोनवणे यांनी दिला. याच बरोबर बीड जिल्ह्यामध्ये जे चाललंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. बीड जिल्ह्यात अनेक घटना घडतात की या गुन्ह्यांची पाळेमुळे परळीतील विशिष्ठ लोकांच्याकडे सापडतात. अतिशय वाईट कृत्य करणारे तरुण परळी शहरात आणि परिसरात तयार होत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. स्व. संतोष देशमुख यांचे ज्या दिवशी अपहरण आणि मर्डर झाला त्या दिवसापासून मी संसदेत व बाहेर आवाज उठवत आहे. सर्व आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते बोलत आहेत, मात्र या गुंड प्रवृत्तीला रोखण्यासाठी पोलिसांनी क्रियाशील पुढाकार घ्यायला हवा, असेही खा.सोनवणे म्हणाले.

००

परळी पॅटर्नसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आयपीएस लेव्हलचा एक विशेष अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी करणार आहे.परळी मध्ये १९९२ पासून सत्तेने मस्तावलेली प्रवृत्ती आहे. सत्तेचा राजाश्रय मिळत असल्याने हे लोक दादागिरी आणि गुंडगिरी करीत आहेत.

०००

बोगस पिकविमा उचलण्यातही हेच लोक

बोगस पिकविम्याचे लाखो नव्हे तर करोडो रुपये काही धेंडानी उचलले आहेत. नांदेड, लातूर, परभणी अशा चारपाच जिल्ह्यात बोगस पीकविमा भरला आहे. याची सर्वांकडे ऑफलाईन पद्धतीने तक्रार केलेली आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याच्या गृहखात्यावर आणि जेल प्रशासनावर बोलले पाहिजेत. बीडचे जेल प्रशासन हे जास्तच बोगस प्रशासन आहे, याचा उल्लेखही खा.सोनवणे यांनी केला.