कर्मवीर ऍड.एकनाथराव (जिजा) आवाड राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्काराने लक्ष्मीकांत शिंदे सन्मानित

Samajik

वेध मराठी मनाचा...

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

शोषित, पिडीत व उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी शासन, प्रशासन व प्रस्थापितांच्या विरोधात बंड करून सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य झिजविणारे कर्मवीर ऍड.एकनाथराव (जिजा) आवाड यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्रात उपेक्षित माणसांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रेरणा मिळावी. यासाठी युवा प्रतिष्ठान, अंबाजोगाईच्या वतीने समाजात प्रबोधन करणारे, धम्म चळवळ गतीमान करून योगदान देणाऱ्यांना दरवर्षी पुरस्कार दिला जातो. यावर्षी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत शिंदे (पुर्णा) यांना सन-२०२५ साठी दिला जाणारा कर्मवीर ऍड.एकनाथराव आवाड राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता हा पुरस्कार शनिवार, दि.२५ मे २०२५ रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे ९ वे वर्ष होते. यावेळी मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.विजय कुमठेकर (जालना) तर उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दहिफळे (अध्यक्ष, दत्त सेवाभावी संस्था) हे होते. यावेळी मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.मिलींद आवाड (जे.एन.यु.दिल्ली) यांची विशेष उपस्थिती लाभली. या प्रसंगी लक्ष्मीकांत शिंदे (पुर्णा) यांना राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार - २०२५ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सचिन बगाडे (अध्यक्ष, सत्यशोधक बहुजन आघाडी.), संतोष नरसिंगे (सि.ओ.महानेता ग्रुप.), शितल लांडगे (अध्यक्ष,स्वप्नपूर्ती सेवाभावी संस्था, केज) हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अंबाजोगाई येथे विलासराव देशमुख नगरपरिषद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ असे आहे. प्रारंभी प्रास्ताविक करताना आयोजक अशोक पालके म्हणाले की, युवा प्रतिष्ठानच्या वतीने जिजांच्या स्मृतीदिनी सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा सन्मान कर्मवीर ऍड.एकनाथराव आवाड विद्रोही कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. हे या उपक्रमाचं नववे वर्ष आहे. जिजांचा लढा हा सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कांचा लढा होता. गायरान धारकाची चळवळ पुनर्जिवित करून सरकारी जमीन कास्तकऱ्यांच्या नांवे होत नाहीत. तोपर्यंत नव्याने संघर्ष करून न्याय मिळवून देणे हेच जिजांना अभिवादन ठरेल, मागील नऊ वर्षांपासून युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही शिव - फुले - शाहू - आंबेडकर - आण्णा भाऊ या महामानवांना अभिप्रेत असलेले कार्य व त्यांचे प्रवर्तनवादी विचार पुढे नेत आहोत असे अशोक पालके यांनी सांगितले. तर प्रा.डॉ.मिलींद आवाड (जे.एन.यु.दिल्ली) यांनी सातत्याने पुरस्कारांची मालिका सुरू ठेवल्याबद्दल अशोक भाऊंचे, रेखाताई व सर्व युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. सध्या महाराष्ट्रातलं वातावरण पाहता आपणाला महामानवांचा विचार पुढे घेऊन जात असताना उपेक्षित, वंचित माणसाच्या प्रश्नांसाठी एकत्रित येऊन संघर्ष करावा लागणार आहे. गायरानाची बंद पडलेली चळवळ पुनर्जिवित करून गायरान धारकाला न्याय मिळवून द्यावा लागणार आहे. अशोक भाऊ तुम्ही पुढे चला मी तुमच्या सोबत आहे असा शब्द प्रा.डॉ.आवाड यांनी उपस्थितांना दिला. सत्काराला उत्तर देताना लक्ष्मीकांत शिंदे म्हणाले की, या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. जिजांचे अधूरे राहिलेले काम पूर्ण करणे हेच त्यांना अभिवादन असेल, माझ्याकडून चळवळीला गालबोट लागणार नाही. याची मी दक्षता घेईन. महापुरूषांचे विचार मांग वाड्यामध्ये पेरण्याचा मी सातत्याने प्रयत्न करेल, आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासास मी पात्र राहीन अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. यावेळी उद्घाटक प्रशांत दहिफळे, माजी सरपंच हनुमंत गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिजांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. जवळगाव येथील गायरानधारक महिला व पुरूष यांचा सन्मान करण्यात आला. तर वाघमारे कुटुंबिय यांचा ही सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डॉ.विजय कुमठेकर म्हणाले की, आरक्षणातून पोटाचा प्रश्न सुटू शकतो. पण, ज्ञान हे मिळवावे लागते. शोषित, वंचितांच्या नांवाने आज राजकारण केले जाते. पण, शोषित, वंचितांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष केला तो जिजांनीच. त्यांच्या नांवाने दिला जाणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे वंचितांच्या प्रश्नांवर लढा उभारला पाहिजे. एकिकडे आरक्षण संपवून दुसरीकडे संघीय सरकार जाती-जातीत संघर्ष निर्माण करीत आहे. जो पर्यंत मातंग समाज शिक्षण प्राप्त करीत नाही. तो पर्यंत समाजाची प्रगती अशक्य आहे. मातंग समाजात नवे नेते अभ्यासू नेतृत्व तयार झाले पाहिजे, आजच्या संघर्षाच्या काळात जिजांचा विचार पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. ते काम अशोक पालके समर्थपणे करीत आहेत. त्यांचं अभिनंदन. जिजांच्या कामाची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या लक्ष्मीकांत शिंदे यांची पुरस्कारासाठी केलेली निवड योग्य केली आहे असं प्रा.डॉ.कुमठेकर म्हणाले. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वसंतराव उदार यांनी केले. तर सन्मानपत्राचे वाचन मस्के सर यांनी केले. उपस्थितांचे आभार महेश जोगदंड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर व परिसरातील प्रवर्तनवादी चळवळीतील नेते, कार्यकर्ते आणि महिला, पुरूष, युवक व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व आयोजक अशोक पालके, रेखा सरवदे, दिलीप पालके, सुरज जोगदंड, दत्ता पालके, परमेश्वर जोगदंड, नवनाथ हारे, बाळासाहेब हारे, प्रा.दयानंद कांबळे, माणिक आगळे, गोविंद मोहिते आदींनी पुढाकार घेतला होता.