आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या युगात मुलींना करिअरच्या विपुल संधी - प्रेरणादायी वक्ते सर नागेश जोंधळे

Zilla Vishesh

 

 

बालिका दिनानिमित्त प्रगती मुलींच्या वसतीगृहात व्यक्तिमत्व विकासावर व्याख्यान

 

=======================

अंबाजोगाई (प्रतिनिधी) 

आजचे युग हे माहिती तंत्रज्ञान, विज्ञान व आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे आहे व यात मुली व महिलांना ग्रामीण भागातून मेट्रो शहरातील कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जाण्यासाठी विपुल प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे जीवनात अधिक यशस्वी होण्यासाठी माता सावित्रीबाई फुले यांचा शिक्षण क्षेत्रात केलेल्या खडतर अशा परिस्थितीतून भरीव कामगिरीचा आदर्श ठेवणे गरजेचे आहे. पाय जमिनीवर ठेवत आकाशाला गवसणी घालण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते तथा अमेझॉन नंबर वन बेस्ट सेलिंग लेखक सर नागेश जोंधळे यांनी बालिका दिनाचे औचित्य साधत प्रगती मुलींचे वसतीगृह, अंबाजोगाई येथे खास तरूणींसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्यक्तिमत्व विकास या कार्यक्रमात केले.

 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगती वसतीगृहाच्या संचालिका विद्याताई देशमुख, प्रमुख मार्गदर्शक आई सेंटरचे प्रो चे संचालक तथा विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे हे होते. तसेच यावेळी अण्णा देशमुख गुरूजी व रूकमांगद देशमुख यांची ही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना सर नागेश जोंधळे यांनी सांगितले की, समाजात व पालकांत सकारात्मक बदल होत असून आज घडीला मुलींना शिक्षणासाठी केवळ गावातीलच नव्हे तर शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे यासोबतच मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि अंबाजोगाई येथे पालक मोठ्या प्रमाणात पाठवत असून त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम प्रभावीपणे होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. याला प्रतिसाद देत मुली व महिला देखील केवळ शैक्षणिकच नव्हे तर विविध स्पर्धा परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान, बॅंकिंग, व्यवसाय क्षेत्र, तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय यासह समाजाच्या विविध क्षेत्रात देखील उल्लेखनीय प्रगती करीत अग्रस्थान मिळवत आहेत. हे चित्र आशादायक व आनंददायी आहे. यामध्ये खारीचा वाटा उचलणाऱ्या प्रगती वसतीगृहाच्या संचालिका विद्याताई देशमुख व रूक्मांगद देशमुख हे अगदी प्रामाणिकपणे करीत आहेत. अंबाजोगाई शहरात अगदी घरच्या सारखी काळजी घेत, शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाईत आलेल्या बाहेरगावच्या, ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाबरोबरच राहण्या व जेवणाची उत्तम व्यवस्था उपलब्ध करून देत त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुमोल योगदान देत आहेत. याकरिता आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व आई सेंटर प्रो तर्फे सर नागेश जोंधळे यांच्या हस्ते विद्याताई देशमुख व रूक्मांगद देशमुख यांचा बालिका दिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आई सेंटर प्रो चे डायनॅमिक युवा नेतृत्व समन्वयक कु.पल्लवी सुशीला रंगनाथ माने यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या सूत्रसंचालनातून आजची स्त्री ही केवळ घराच्या चार भिंतीच्या आतच एवढेच मर्यादित न राहता परिस्थितीशी दोन हात करीत ती पुरूषांच्या बरोबरीने वैमानिक बनून थेट आकाशामध्ये सुद्धा झेप घेत असल्याचे अधोरेखित करीत असल्याचे सांगून मान्यवरांसह उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित तरूणींनी देखील प्रेरणादायी वक्ते सर नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपला सक्रिय, सकारात्मक सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रगती मुलींच्या वसतिगृहाच्या संचालिका विद्याताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व पल्लवी माने यांच्या नेतृत्वात प्रतिक्षा टेहळे, विशाखा गायकवाड, पायल राठोड, अक्षरा गडदे, काजल शिंदे व आदिती शिंदे यांनी पुढाकार घेतला.