कै.राजाभाऊ चौसाळकर यांचे कार्य प्रेरणादायी - डॉ.शरदराव हेबाळकर

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सामाजिक कार्य करीत असताना कितीही संकटं, अनेक अडचणी आल्या तरी कै.राजाभाऊ चौसाळकर यांनी हसतमुखाने संघर्ष केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जडणघडणीत कै.राजाभाऊ चौसाळकर यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांनी सामाजिक दायित्व म्हणून काम केले. त्यांचा वारसा शिक्षकांनी जोपासला पाहिजे असे आवाहन इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ.शरदराव हेबाळकर यांनी केले.
येथील खोलेश्वर महाविद्यालयात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक सदस्य कै.राजाभाऊ दादा तथा बाळकृष्ण शिवाजीराव चौसाळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित आजी-माजी शिक्षक मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर, ज्येष्ठ स्वयंसेवक तथा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक सदस्य तुळशीरामजी धायगुडे गुरूजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकरराव चौसाळकर, स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह किरणदादा कोदरकर आदींची मंचावर उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.हेबाळकर यांनी भाग्यवान असलेल्या कार्यकर्त्यांनी संघाच्या जडणघडणीत काम केले. तुळशीरामजी धायगुडे कै.राजाभाऊ चौसाळकर, कै.खारकर गुरूजी, वैद्य गुरूजी, कोदरकर गुरूजी आदींनी ७५ वर्षांपूर्वी शिक्षण संस्था उभारून राष्ट्रभक्त व सुसंस्कारित पिढ्या घडविण्याचे कार्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जडणघणीत अनेक अडचणी आल्या परंतु, संघ कार्यकर्त्यांनी त्यावर मात करून सर्व लोकांना एकत्रित आणल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा संघ कार्यवाह बिपिनदादा क्षीरसागर यांनी आपले मनोगत मांडताना संस्थेच्या इतिहासातील आठवणींना उजाळा दिला तसेच संस्थेला वैचारिक दिशा देणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यापैकी कै.राजाभाऊ चौसाळकर यांनी संघाच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम केले असून राजाभाऊ दादा हे त्यांचे आयुष्य कणखरपणाने जगले. ते मनाने खंबीर होते. आज कुटुंबप्रमुखाचा स्मृतीसहळा त्यानिमित्ताने आजी-माजी शिक्षकांचा मेळावा खरोखरच अभिनव संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलुरकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये सांगितले कै.राजाभाऊ चौसाळकर यांनी केलेले कार्य महान आहेच. त्यांनी ते कार्य संघकार्याचे व्रत म्हणून केले. ते कार्य प्रखरपणाने व प्रभावीपणे केले. यापुढे शिक्षकांनी संघ स्वयंसेवकांची आदर्श प्रणाली घेऊन वाटचाल केली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेविका सौ.सुचिता अतुलराव देशपांडे निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच ऑस्ट्रेलिया येथे मराठी शाळा स्थापन करून यशस्वीशिपणे चालवत असल्याबद्दल डॉ.कपिल चौसाळकर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात केंद्रीय कार्यकारणी सदस्य सौ.कल्पनाताई चौसाळकर, सौ.वर्षाताई मुंडे, विष्णु सोनवणे, नितीन चौधरी तसेच प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष उन्मेष मातेकर, माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष अविनाश मुडेगावकर, सर्व संस्कार केंद्रप्रमुख, माजी सेवानिवृत्त कर्मचारी खोलेश्वर शैक्षणिक संकुल कर्मचारी आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह किरणदादा कोदरकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश कंगळे व दत्तप्रसाद गोस्वामी यांनी केले तर वैयक्तिक पद्य प्रा.शैलेश पुराणिक यांनी सादर केले कार्यक्रमाचे आभार डॉ.गोपाळ चौसाळकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्राने करण्यात आली

