पात्र लाभार्थ्यांना द्या, शेतकरी कार्डचा लाभ - जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण

Krushi

बीड जिल्हा प्रतिनिधी 

 

यादीत नांव असूनही शेतकऱ्यांना लाभ मिळेना ; आंदोलनाचा इशारा

=====================

अंबाजोगाई (प्रतिनिधी) 

अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतकरी कार्डवरील लाभ देणे तात्काळ सुरू करा, पात्र लाभार्थ्यांना द्या, शेतकरी कार्डचा लाभ अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी केली आहे. या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी, बीड यांना निवेदन देण्यात आले.

 

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांच्या वतीने जिल्हाधिकारी, बीड यांना देण्यात आलेले सदरील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी स्वीकारले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अंबाजोगाई तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेतकरी रेशनकार्ड बंद पडल्या सारखेच आहेत. शेतकरी कार्डचा ऑनलाईन लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा व इतर कागदपत्रे अपलोड करून एक ते दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला असताना ही अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप ही ऑनलाईन पेमेंट न पडल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. तहसील कार्यालय, अंबाजोगाई या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता यादीत नांव आहे असे सांगण्यात येते. पण, त्याची त्रुटी काय आहे किंवा ऑनलाईन लाभ का मिळत नाही याबद्दल त्यांच्याकडे कोणती हि माहिती नाही. त्यांच्या म्हणण्यानूसार जिल्हाधिकारी कार्यालयातून यादी आल्यानंतर त्यामधील त्रुटी व कारण सांगता येईल. यादीत नांव असूनही लाभार्थी शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. शेतकरी रेशनकार्ड ज्या तारखेला ऑनलाईन अपलोड केले आहे. त्या तारखेपासून आजपर्यंतचा शेतकरी लाभार्थ्यांना ऑनलाईन लाभ देण्यात यावा अशी विनंती करून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सदरील निवेदन माहितीस्तव तहसीलदार, अंबाजोगाई यांना देण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी यांनी सदरील निवेदन स्वीकारून याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच, या मागणीवर लवकरात लवकर निर्णय न झाल्यास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांच्या वतीने देण्यात आला. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.