लग्न समारंभास आलेल्या पाहुण्यांना शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथ भेट देऊन केले स्वागत

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
पुरोगामी महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा वैचारिक पाया अधिक भक्कम करण्याचा अभिनव उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक
वडवणी : प्रतिनिधी
लग्न समारंभास उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ भेट देऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. हा अभिनव उपक्रम मौजे पहाडी पारगाव ता.धारूर जि. बीड येथे निरडे व मंत्रे परिवाराच्या विवाहा सोहण्यात पहावयास मिळाला. एमएसएफ मध्ये कार्यरत असलेले गोपाल सीताबाई रामेश्वर निरडे कचारवाडी ता.धारूर जिल्हा बीड व उच्चशिक्षित असलेल्या गायत्री लक्ष्मी शिवाजी मंत्रे पहाडी पारगाव ता.धारूर जिल्हा बीड
यांचा विवाह सोहळा नुकताच पहाडी पारगाव येथे संपन्न झाला.
महाराष्ट्राला थोर संतांची व महापुरुषांची परंपरा व वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राची ओळख ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सर्वत्र आहे. महाराष्ट्रामध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे ती टिकली पाहिजे व परिवर्तनवादी महापुरुषांचे विचारच समाजाला योग्य दिशेकडे घेऊन जाऊ शकतात या अनुषंगाने ग्रामीण भागातील तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, वंचित घटकापर्यंत त्यांचे विचार पोहोचले जावे या सामाजिक जाणिवेतून विवाह सोहळ्यामध्ये मध्ये आलेल्या पै पाहुण्यांना व मित्र परिवाराला शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले व आभार व्यक्त करण्यात आले असून हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक संदेश देण्याचे काम केले.
विद्यार्थी दशेमध्ये शिक्षण घेत असताना
महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव पडलेले व अत्यंत कष्टातून व संघर्षातून, अभ्यास व संघर्ष करून महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये कार्यरत असलेले गोपाल व त्याचे मोठे बंधू सध्या महाराष्ट्र वन विभागामध्ये कार्यरत असलेले गोविंदे या दोन्ही बंधूंच्या जीवनामध्ये महापुरुषांचे विचार जीवनाला कलाटणी देणारे ठरले. दोन्ही भावंडांनी अत्यंत कष्टातून, मेहनतीतून, जिद्दीतून आई - वडिलांचे स्वप्न साकार करूनआज स्वतःला सिद्ध केले आहे. कचारवाडी सारख्या ग्रामीण व डोंगराळ भागातून जिथे शिक्षणाची गंगोत्री आजही पोहोचलेली नाही अशा मागास भागातून बीड सारख्या शहरांमध्ये येऊन वेळप्रसंगी पार्ट टाईम जॉब करून शिक्षण घेतलेले हे भावंड आज नक्कीच विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी प्रेरणादायी आहेत. गोविंद निरडे यांनी देखील तीन वर्षांपूर्वी त्यांच्या विवाह सोहळ्यामध्ये अशाच प्रकारे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे शिवचरित्र आपल्या लग्न समारंभामध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना भेट देऊन सन्मानित केले होते. ती परंपरा त्यांनी पुढे त्यांच्या भावाच्या लग्नात देखील कायम ठेवली आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा वैचारिक पाया हा अधिक भक्कम होणे हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे दोन्ही भावंडांकडून सांगण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे लग्न समारंभास आलेल्या सर्व पाहुण्यांकडून, शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, शिक्षक, विद्यार्थी, युवक, महिला, प्राध्यापक, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते व सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत असून वाचन संस्कृती पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा हा प्रयत्न नक्कीच इतरांनाही प्रेरणादायी ठरेल व विवाह सोहळ्यामध्ये आलेल्या पाहुण्यांना पुस्तिका व ग्रंथ भेट देण्याचा नवा पायंडा समाजामध्ये रुजू होईल अशी आशा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. या लग्न समारंभास शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथाच्या 2000 प्रति भेट देऊन आभार व्यक्त करण्यात आले. हे कौतुकास्पद आहे.

